ECOLOGY
भूमी आणि माणूस यांच्यातील नात्याचा प्रवास हा मला अत्यंत आकर्षून घेणारा विषय आहे. जीवसृष्टीचा इतिहास साडेतीन अब्ज वर्षांचा आहे. या पार्श्वभूमीवर माणसाकडे बघून काय दिसते? त्याचा पृथ्वीतलावरचा इतिहास तसा नवा आहे. त्याला जगण्याच्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या लहान जीवांच्या तुलनेत मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे शरीर वारश्यातच मिळाले आहे. त्याला जगण्यासाठी त्याच्या भाईबंदांचा आधार लागतो. परंतु तरीही व्यक्ती म्हणून त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे. मुंग्या अथवा मधमाश्यांप्रमाणे त्याची प्रजनन व्यवस्था राणीच्या अवतीभवती नाही. असे सहजीवन हा त्याचा नैसर्गिक वारसा नाही. केवळ एकटेपणा आणि केवळ सहजीवन या दोन्ही टोकांच्या मधली उत्क्रांतीच्या भव्य पटावरची ही एक त्रिशंकू अवस्था म्हणावे काय? इथून पुढचा प्रवास कसा आहे? माणसाला काय करायचे आहे? किंवा तो काय करताना दिसतो आहे? त्याला इथे जुळवून घेऊन राहायचे आहे की अस्तित्वाच्या मर्यादा तपासत कायम नष्ट होण्याच्या शक्यतेच्या आसपास राहायचे आहे? उत्क्रांतीचा तीन अब्ज वर्षांचा इतिहास आजच्या वर्तमानाचा आधार असला तरी आजचा निर्णय, आजची कृती, आजचा अनुभव जीवसृष्टीला पुढे चालवतो आहे. या अनुभवाचा तळ शोधण्यासाठी साहित्य निर्मिती असा माझा दृष्टीकोन आहे. ‘घाटमाथा’ देखिल याच दृष्टीकोनाचा विस्तार आहे.
HISTORY
इतिहास हा कवितेसारखाच असतो, अन्वयार्थाच्या अनेक शक्यता असलेला. भौतिक पुराव्यांच्या बाहेर कितीतरी उरणारा. कृष्णेकाठी कुंडल असं म्हटल्यावर आपल्याला हरवून गेल्यासारखं का होतं? काय जादू आहे या दोन शब्दात? कुंडल तर आता ‘पहिले उरले नाही’. आणि नदी तरी कुठे तीच असते? आपण ज्या पाण्यात पाय बुडवतो ते पाणी केंव्हाच पुढे निघून जातं. तरी नदी नदीच राहते.. मग गाव? वर्तमान असा वेगळा नाहीच, भूतकाळानंच हातपाय ताणले आहेत.
PHILOSOPHY
माझ्या लाडक्या बाळा
मला तुझे लाड करण्याची संधी दे
तू ज्या वृक्षाच्या सावलीत बसशील तो कल्पवृक्ष व्हावा
आणि त्याने तुझ्यासाठी उत्तमोत्तम फळे, फुले ढाळावीत
असं मला नेहेमीच वाटेल
पण तसं झालं तर तो फक्त योगायोग असेल हे तू जाणतोस
माझे प्रेम तुझ्या रस्त्यातले आरामाचे थांबे बनू दे
तुझा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असेल तर मला मुळीच वाईट वाटणार नाही
तुला त्या रस्त्यावर मजेचे गाणे गाता आले नाही तर मात्र मला जरूर दुःख होईल
जायचे कुठे, चालायचे कसे हे तुझे तू ठरव
तू मळलेल्या वाटेने चालला नाहीस तरी तू माझा लाडका बाळ आहेस हे विसरू नकोस
तुझ्या भुकेची सोय होईल एवढे स्तन्य आजही माझ्यापाशी आहे
माझ्या बाळा, तुला मजेत भरविण्याचे माझे सुखचित्र
असेच कायम असू दे!
(मजारामाच्या गोष्टी)